महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दुर्घटना ही मांडवा येथे घडली आहे. मांडव्यात उदय सामंत यांची बोट जेट्टीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्योगमंत्री उदय सामंत आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजेही होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली.
याआधीही उदय सामंत बोटीच्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. 20 जानेवारी रोजी उदय सामंत रायगड जिल्ह्यातील मांडवा येथून मुंबईत गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास करताना त्यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती. स्पीड बोटीची सर्व यंत्रणा बंद पडल्यानंतर बोटीच्या कॅप्टनला रेस्क्यूसाठी आपत्कालीन संदेशसुद्धा पाठवता येत नव्हता. सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही प्रयत्न करून दुसरी स्पीड बोट मागवली. व उदय सामंत यांना सुखरूप परत आणले होते.
