राहुल गांधींना सूरत न्यायालयाकडून जामीन मंजूर, पुढील सुनावणी 13 एप्रिलला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाकडून आज मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सूरत येथील कनिष्ठ न्यायालयाने सुनावली होती. राहुल गांधी यांनी याविरोधात आज सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सूरतमध्ये सत्र न्यायालयात आज राहुल गांधी यांच्या जामीनावर काय सुनावणी होते, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. विशेषतः देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज सूरतमध्ये दाखल झाले होते.

सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधी यांनी कोर्टात अपील करणं आवश्यक होतं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल. आता याबाबत नेमकं काय होईल ते १३ एप्रिलला समजू शकणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही. मात्र दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई होती त्यावर विचार होईल.

2019 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. सगळ्या चोरांचं आडनाव मोदीच कसं असतं, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. याविरोधात सूरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 23 मार्च रोजी सूरत कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मंजूर झाला होता.