छत्रपती संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावरच आता संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“वज्रमूठ सभेला प्रतिसाद दिसत नव्हता, सभेसाठी बाहेरून लोकं आणली होती. महानगर पालिकेत त्यांची इतकी वर्षे सत्ता होती पण आपण पाणी लोकांना देऊ शकलो नाही. शहराला तुम्ही नवीन नावे देवून गेलेले आहात. तुम्ही वारंवार जे मुद्दे काढता, लोकं त्रस्त झालेले आहेत. लोकांना रोजगार पाहिजे, पाणी पाहिजे. चांगले रस्ते पाहिजे,” असे जलील म्हणाले.
“तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा वारंवार काढत आहात. लोकांना काय पाहिजे? तर रोजगार पाहिजे. लोकांना पाणी, चांगले रस्ते पाहिजे, या सर्वसामान्य गोष्टी लोकांना पाहिजे आहेत. लोकांच्या या अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय सामान्य असलेल्या गरजांवर तुम्ही बोलायला तयार नाहीत. फक्त एकमेकांवर चिखल फेकण्यासाठी तुम्ही मोठी सभा घेत असाल तर एकवेळ अशी येईल फक्त मंचावर जास्त लोकं दिसतील, समोर कुणी बसलेलं दिसणार नाही. कारण लोकं खूप हैराण झाली आहेत”, असं जलील म्हणाले.
