ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या गळ्यातील लोढणे बनले असल्याची कुजबुज काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. तरीही छत्रपती संभाजीनगर येथील सभेत जणू काही अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी हिन वागणूक देत औकात दाखवून दिल्याची चर्चा आहे. यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभेस येण्याचे टाळले अशी चर्चा आहे.
म्हणायला महाविकास आघाडीची वज्रमूठ असली तरी संभाजीनगर येथील सभा पूर्णपणे ठाकरे गटाने हायजॅक केली होती. सभेत तसेच शहरातील बॅनरवर अजित पवार किंवा नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यापेक्षा उद्वव ठाकरे यांचे फोटो मोठे होते. धक्कादायक म्हणजे उद्धव ठाकरे यांची व्यासपीठावरील खुर्चीही इतर नेत्यांपेक्षा मोठी होती. सभेत अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झाली. मात्र मुख्य भाषण हे उद्धव ठाकरे यांचेच असल्याप्रमाणे ते उठल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक सभा एकत्र घेतल्या आहेत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असोत की काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, व्यासपीठावर मोठी खुर्ची ठेवली जात नाही.
सभेच्या तयारीच्या वेळीच ठाकरे यांनाच जादा महत्व दिले जात असल्याचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. याची माहिती नेत्यांना देण्यात आली होती. इतर नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही तरी नाना पटोले यांनी मात्र हे गांभीर्याने घेतले. त्यामुळेच आजापणामुळे आपण उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी सांगितले.राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. ठाकरे पडले तरी नाक वरच अशी त्यांच्या काही नेत्यांची भूमिका असल्याची टीका काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
