नवी दिल्ली : सीबीआयला ६० वर्षे पूर्ण झाली आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘तुम्हाला (सीबीआय) कुठेही थांबण्याची गरज नाही. मला माहीत आहे की तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात ते खूप शक्तिशाली लोकं आहेत, ते वर्षानुवर्षे सरकार आणि व्यवस्थेचा भाग आहेत. आजही अनेक ठिकाणी ते कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेचा भाग आहेत, मात्र तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नये.
देशातील जनतेचा सीबीआयवर विश्वास आहे, त्यामुळे आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला सामोरे जाण्याची आशा लोकांना मिळाली आहे.या ६ दशकांत सीबीआयने बहुआयामी व अत्यंत शिस्तप्रिय तपास यंत्रणा म्हणून आपली ओळख निर्माण केली. महानगरांपासून जंगलांपर्यंत सीबीआयला धावावे लागत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भ्रष्टाचार सामान्य गुन्हा नाही, त्यावर अंकुश लावण्याची मोठी जबाबदारी
पीएम म्हणाले – देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची सीबीआयची मुख्य जबाबदारी आहे. भ्रष्टाचार सामान्य गुन्हा नाही. भ्रष्टाचार गरिबांचे हक्क हिरावून घेतो. अनेक गुन्ह्यांना जन्म देतो. लोकशाही व न्यायाच्या मार्गातील भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचार असेल तिथे तरुणांना योग्य संधी मिळत नाही. तिथे केवळ एक विशिष्ट इकोसिस्टम भरभराटीला येते. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू असतो. येथूनच घराणेशाही व कुटुंबवादाला बळ मिळते.
२०१४ पूर्वी एका फोनवर अनेकांना कोट्यवधींचे कर्ज मिळत होते
मोदी म्हणाले – भ्रष्टाचाराने आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया असणारी बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त झाली. गत काही वर्षांत सरकारने आपल्या बँकिंग क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेत. आज आपण इंटरनेट बँकिंगबद्दल बोलतो. UPI द्वारे झालेल्या विक्रमी व्यवहारांवर चर्चा करतो. आपण २०१४ पूर्वीचा बँकिंगचा काळही पाहिला आहे. तेव्हा दिल्लीतील प्रभावशाली राजकीय पक्षांशी संबंधित लोकांच्या एका फोनवर हजारो कोटींची कर्जे मिळत होती.
देश भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी सीबीआयची आहे, असेही ते म्हणाले. पीएम मोदी म्हणाले की, पूर्वी योजनांमध्ये लूट व्हायची, ती आम्ही थांबवली आहे. काही लोक बँका लुटून पळून गेले, त्या लोकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना ना कोणावर अन्याय करायचा आहे आणि ना सहन करायचा आहे. पुढील १५ वर्षांत तुम्ही काय करणार आणि २०४७ पर्यंत तुमची योजना काय असेल, हे सीबीआयने लक्ष्य निश्चित करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी सीबीआयला स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात ते खूप शक्तिशाली लोक आहेत, पण थांबू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु त्यांचा संदर्भ लालू यादव कुटुंबाकडे असल्याचे मानले जाते. ते म्हणाले की, तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात तेच सत्तेत होते आणि आजही कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेत बसले आहेत. लँड फॉर जॉब घोटाळ्यात लालू यादव कुटुंबाविरुद्ध सुरू असलेल्या सीबीआय तपासाशी त्यांचं हे वक्तव्य जोडले जात आहे. कोट्यावधी भारतीयांनी येत्या २५ वर्षांत भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. व्यावसायिक आणि प्रभावी संस्थांशिवाय विकसित भारताची निर्मिती शक्य नाही. त्यामुळे सीबीआयवर मोठी जबाबदारी आहे.
