मुंबई : अलीकडच्या चा काळात बाजारबुणगेही मोदी साहेबांवर बोलतात असा जोरदार हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केला. हे राऊत, फाऊत, दाऊद जे कोणी असतील त्यांना सांगतो, मोदींकडे तोंड करुन थुंकण्याचा प्रयत्न करू नका, थुंकी तुमच्या तोंडावर पडतेय, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई येथे सावरकर गौरव यात्रेत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसकडून झालेल्या सावरकरांचा अपमान आणि महाविकास आघाडीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात बाजार बुणगे ही मोदी साहेबांवर बोलतात. या बाजार मुंग्यांना सांगू इच्छितो की सूर्याकडे पाहून थुंकाल तर थुंकी तुमच्या तोंडावर पडेल. सूर्यावर पडू शकत नाही. या बाजारबुणग्यांना राऊत, फाऊत, दाऊद जे असतील त्यांना सांगू इच्छितो मोदींकडे पाहून थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते आहे. थुंकीने लदबदलेला तुमचा चेहरा पाहण्याची इच्छा कोणाचीही नाही आहे. म्हणून ते जेवढे वेळा सावरकरांचा अपमान करतील तेवढ्या वेळाने भारतातील नागरिक पेटून उठेल. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय म्हणून रस्त्यावर येईल. त्यांना त्यांची औकात दाखवून देईल.
काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर म्हणून अपमान केला. पण दुर्दैव अजून एक आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसले आहेत. ती अत्यंत शरमेची गोष्ट आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस करते . उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसच्या मुख्यपत्राने सावरकर समलैंगिक होते असा अंक काढला होता. पण हे त्याचा निषेध करू शकले नाहीत.
उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यवर बोलताना फडणवीस म्हणाले, सावरकरांचा अपमान झाल्यावर आम्हालाही चालणार नाही, आम्हाला चालणार नाही असे म्हणतात. ते चालवतातच आहे. हे असे झाले की पूर्वी काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी पाकिस्तान आपल्याकडे बॉम्बस्फोट करायचे. त्यावेळी सरकार म्हणायचे आम्ही तुमचा निषेध करतो. ते पुन्हा स्फोट करायचे. मग म्हणायचे तीव्र शब्दात निषेध करतो. ते पुन्हा पुन्हा बॉम्बस्फोट करायचे आणि ते म्हणायचे आता युनायटेड नेशनला जाऊन तुमच नाव सांगतो. नरेंद्र मोदींसारखा एक नेता आला. बॉम्बस्फोट झाल्याबरोबर सर्जिकल स्ट्राइक केला. पुन्हा आमच्यावर हल्ला झाला. एअर स्ट्राईक केला. काम करायचे असते ते असे करायचे असते.
अभिमान असेल तर तुमच्या कामांमध्ये दिसला पाहिजे. तुमच्या कृतीमध्ये दिसला पाहिजे. नुसता शब्दांमधला स्वाभिमान बेगडी आहे. तुमचा स्वाभिमान कृतीत असता तर बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याप्रमाणे मणिशंकर अय्यरला चपला मारल्या होत्या तसेच राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचे काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केला अस्ते. पण खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्यासोबत आहे. म्हणून राहुल गांधींना जोडे मारण्याचे काम देखील आम्हालाच करावे लागेल. ते तुम्ही केले नाहीत.
फडणवीस म्हणाले, हे जे चालले आहे मला असे वाटते की ते आपले विचार विसरले आहेत. आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला ते विसरले आहेत. सरकारे येतील आणि जातील. एखादे सरकार राहणार नाही. तुम्ही राजकीय दृष्ट्या युती कराल किंवा नाही कराल. तुम्हाला ज्यांच्या सोबत जायचे त्यांच्यासोबत जा. पण हे होत असताना सावरकरांचा अपमान जर तुम्ही सहन करणार असाल तर त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल लागेल. नुसते तोंडाने बोलून चालत नाही. हिंमत दाखवा. ती हिंमत तुमच्यामध्ये नाही. त्यामुळे बातम्या सोडतात. म्हणाले की राहुल गांधींना आता पवार साहेबांनी सांगितले आहे की तुम्ही सावरकरांवर बोलू नका. अरे पण राहुल गांधींच्या तोंडून एकदा येऊ द्या ना. तुम्ही राजीव गांधींच्या जयंतीला मुख्यमंत्री म्हणून हार घालत होता. बाळासाहेब ठाकरेंच्या एका जयंतीला तरी राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी ट्विट तरी केले आहे. त्यांनी कधीच ट्विट केले नाही. तुम्हाला कोणासोबत जायचे असेल तर जा आम्ही हिंदुत्व सोडणार नाही. आम्ही भगवा सोडणार नाही.
