ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी टीका केली. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उध्दव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘ जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही. ज्या दिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं.’ असा इशारा त्यांनी यावेळी ठाकरेंना दिला.
त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ते जितक्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे. मात्र, मी तसं बोलणार नाही. असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
