माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गद्दार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिलं जाईल, असा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. गद्दार उद्धव ठाकरे आहेत. मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादीकडून किती खोके घेतले याची चौकशी करावी लागेल, असंही रामदास कदम म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण खातं काका म्हणून माझ्याकडून समजून घेतलं. नंतर काका आऊट साहेब इन!, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोके घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवली. मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केला, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.आपण राष्ट्रवादीची संगत सोडल्यास40 आमदारांना आपल्या पायाजवळ आणून ठेवतो फक्त राष्ट्रवादीला सोडा हीच आमची अट होती. योग्य प्रमाणात निधी मिळत नसल्याने 40 आमदारांनी बंड केलं, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सत्तातंर करण्यासाठी कुणाबरोबर बैठका घेतल्या मला माहिती नाही. मात्र मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीड वर्ष संपर्कात होतो. शिवसेना एकत्र ठेवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही, असेही रामदास कदमांनी म्हंटले आहे.
