नागपूर : प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. पटोले लवकरच गुवाहाटीला असतील त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, असे विधान केले आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.
देशमुख म्हणाले, “माझी विधानं ही पक्षविरोधी वक्तव्ये म्हणता येणार नाहीत, मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामाबाबत सर्व माहिती मी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे अडीच-तीन महिन्यांपूर्वी कानावर घातली आहे. पण ही बाब त्यांनी तक्रारीच्या स्वरुपात घेतली की काय? मला माहिती नाही”
राज्यात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आपआपसांत अनेक कारणांवरून निर्माण झालेल्या समज-गैरसमजामुळे सद्यपरिस्थिती काही बरी नसल्याचे दिसते. यातच काँग्रेसच्या एका नेत्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असा आरोप काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी केलाय. यासह, १६ एप्रिलला पटोले गुवाहाटीत असतील, असंही देशमुख म्हणाले आहेत.
सावरकरांच्या संदर्भात राहुल गांधींना सल्ला
सावरकर हे महान स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आहेत. त्यांच्याबद्दल वक्तव्य करून अनाठायी वाद काढण्यामध्ये कुठेतरी राहुल गांधी यांनी थांबलं पाहिजे. ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी वीरांनी जो लढा त्यांनी दिलाय त्यासाठी त्यांचा आदरच केला पाहिजे. यासंदर्भात शरद पवार यांनीही राहुल गांधी यांचे कान टोचले असून माझी अपेक्षा आहे की, यापुढे राहुल गांधी यांच्या तोंडून सावरकर यांच्याबद्दल काही अनुद्गार निघणार नाही, असं देशमुख म्हणाले. आता या आरोपांवर पटोले काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
