मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडला तर ही नैसर्गिक आपत्ती मानली जाईल. यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. राज्य सरकारचा आतापर्यंतचा शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, पाऊस पडून जे शेतकऱ्यांचे नुकसान होतं. यावर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली. सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मांडण्यात आल. त्यावर चर्चा झाली त्यामध्ये आणखी बदल केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दलच्या अंतिम निर्णय अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय असल्याचं म्हटलं. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, असं ते म्हणाले. रोज पाऊस झाला आणि त्यामध्ये सातत्य असेल तर पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, असं ते म्हणाले. सध्या ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, गारपीट झाली किंवा पाऊस झाला नाही तर मदत केली जाते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं सततचा पाऊस याचा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
