ठाकरे गटाचे पुरुष नेते बसले बिळात लपून! महिला नेत्यांच्या आडून वार

मुंबई : पाण्यातील ठाकरे गटाच्या तरुणीला झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकारानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. मात्र यामध्ये पुरुष नेते बिळात लपून आणि महिला नेत्यांच्या आडून वार केला जात असल्याची चर्चा आहे. ठाण्यात रोशनी शिंदे या तरुणीला झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ शब्दांत टीका केली. त्याला फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.

फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्या भाषेत टीका केली त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महिला नेत्यांना ठाकरे गटाकडून पुढे केले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला होता. याच्यावर ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारे यांनी आ देखे जरा! हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीवर या, असे आव्हान दिले.


दिल्लीतही ठाकरे गटाने प्रियांका चतुर्वेदी यांना पुढे केले आहे. चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. एका बाजूला भाजपच्या प्रदेशाध्यक्षपासून ज्येष्ठ नेते फडणवीस यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून मात्र कोणीही नेता थेट या वादात पडण्यास तयार नाही. महाविकास आघाडीचे नेतेही बाहेरून ठाकरे गटाची सुरू असलेली फजिती पाहत आहेत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीही नेते ठाकरे यांच्या मदतीला आलेले नाहीत.