ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी; ‘या’अटी पाळाव्या लागणार

ठाकरे गटाच्या मोर्चा आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी मोर्चासाठी काही अटी आणि शर्थीला देखील घालून दिल्या आहेत.

रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला जाणार असून पोलिसांनी या प्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच काल गुन्हा दाखल झाल्यामुळे आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात आज पोलीस आयुक्तालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील महामोर्चाला ठाणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. त्यापूर्वी पुढील महत्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

*सदर कार्यक्रम दिलेल्या वेळी तारखेस व ठिकाणी सुरू करून मुदतीत संपविण्यात यावा.
*कार्यक्रम शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता पार पाडण्यात यावा.
*कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्य देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शीत करू नये.
*सदरवेळी आक्षेपार्य, प्रक्षोभक, अगर कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली
*करू नयेत आक्षेपार्य प्रक्षोभक गाणी गाऊ नयेत अथवा वाजवु नयेत.
*व्यक्ति, प्रेत, किंवा आकृत्या त्यांच्या प्रतीमा त्यांचे प्रदर्शन करणे किंवा जाळणे अशी कृत्य करू नये.
*सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोणताही प्रकारे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवून शांततेस बाधा पोहचेल अश्याप्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.