देशात कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 5 हजार 335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कालच्या तुलनेत आजचा आकडा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत नोंदवण्यात आलेला नव्या कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक आकडा आहे. देशात काल दिवसभरात 5335 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 25 हजार 587 वर पोहोचली आहे. देशात सध्या दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सध्या सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळत आहे.
देशात 23 सप्टेंबर रोजी 5,383 रुग्ण वाढले होते. त्यानंतर आज ही संख्या ५ हजारांच्या वर गेली आहे. 13 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. यापैकी कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन तर केरळ-पंजाबमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळनेही सात जुन्या मृत्यूंची यादी अपडेट केली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 929 लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वेगाने वाढला आहे, परंतु येथे रूग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यांना घरी एकटे राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या लोकांना आधीच इतर आजार आहेत, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे निश्चितपणे मध्यम ते गंभीर स्थितीत नोंदवली जात आहेत.
राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. मृत व्यक्तीचं वय 69 वर्षे होते. या व्यक्तीला मूत्रपिंड आणि हृदयविकाराच्या त्रासासह उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांनी लसीची एकही मात्रा घेतली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
