आनंद दिघे यांच्या मृत्यूचा संदर्भ देत रोशनी शिंदेला पोलीस संरक्षणाची शिवसेनेचीच मागणी

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिलांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकारानंतर राजकीय गदारोळ सुरू आहे. मात्र शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी रोशनी शिंदेला पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूचा संदर्भ दिला आहे.

शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांना भेटायला आले होते. त्यावेळी अर्ध्या तासानंतरच दिघे साहेबांना मृत घोषित करण्यात आले. आतमध्ये काय झाले कोणालाही माहित नाही. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत ठाणेकरांच्या मनात आजपर्यंत संभ्रमाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे गटाचे लोक आणि शिंदे गटाचेही लोक संभ्रमात आहेत. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. स्वतःची सत्ता, पक्ष वाचवण्यासाठी जी धडपड चालली आहे त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये.

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, दोन डॉक्टरांनी रोशनी शिंदेला क्लिनचीट देऊनही वारंवार तिला खासगी रुग्णालयात दाखल करत आहेत. तिची प्रकृती ठिक असतानाही तिला गंभीर भासवले जात आहे. गर्भवती नसताना, आहे म्हणून सांगितले जाते. तिला एवढी एक्टींग करायला लावली, की तिला बोलताही येत नसल्याचे सांगितले जात आहे. हे का चालले आहे. गूढ कळले नाही.एकीकडे आजारपण दाखवले जात असताना, उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही, की आतमध्ये काय घडले. म्हणून आम्ही पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात सरकारी डॉक्टरांची टिम पाठवण्याची मागणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यातून सत्य काय ते बाहेर येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ठाण्यातील कासारवडवली परिसरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. बुधवारी रोशनी शिंदेंना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे.