वरळीत नाना लटपटी खटपटी, ठाण्यात काय करणार?

गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना लढवताना सेफ गेमसाठी ठाकरे गटाने नाना लटपटी,खटपटी केल्या. विद्यमान आमदाराचे तिकीट कापले, माजी आमदाराला विधानपरिषदेचे आमिष दाखविले. पण ठाण्यात ठाकरे गटाचे कोणी शिल्लकच नसल्याने आदित्य ठाकरे यांना लढविताना सेफ गेम खेळणार कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पूर्वाश्रमीची अखंड शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ताकद पाठीशी असतानाही 2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना सुरक्षित मतदारसंघ शोधताना नाकी नऊ आले होते. निवडणुकीच्या रिंगणात पदार्पणासाठी शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी विधानसभा मतदारसंघाचीच निवड केली. 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांनी मतदारसंघातून निवडून येत वरळीची बांधणी केली होती. 2014 साली इथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. विद्यमान आमदाराचे तिकीट कापले गेले.एव्हढेच नव्हे तर दगाफटका नको म्हणून 2009 साली येथून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत सामील करून घेण्यात आले. त्यासाठी त्यांना विधान परिषदेचे आमिष दाखविले. एका आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेला विधान परिषदेच्या दोन जागांची किंमत चुकवावी लागली.

आता आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून लढण्याचे राणा भीमदेवी थाटात आव्हान दिले आहे. मात्र ठाण्यात ठाकरे गटाची संघटनाच अस्तित्वात नाही. एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधून कोणाचा तरी बळी घेऊन निवडणूक लढवावी तर एकही आमदार ठाकरे गटाकडे शिल्लक नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही मतदारसंघात येणाऱ्या एकाही विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा आमदार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे संजय मुकुंद केळकर हे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेचे प्रताप बाबूराव सरनाईक हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ठाणे शहरातील या तीनही मतदारसंघात उभे राहण्याचे धाडस आदित्य ठाकरे करू शकणार नाहीत. याशिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक हे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपच्याच मंदा म्हात्रे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार आहेत.

मुळात आता वरळी मतदारसंघातील निवडणूकच आदित्य ठाकरे यांना सोपी नाही. अनेक कार्यकर्त्यांनी विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात जोरदार ताकद लावली आहे. आदित्य ममता बॅनर्जी यांची स्टाईल मारायला बघताहेत! पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देऊन विद्यमान मंत्री असलेले शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांना हा मोठा झटका होता. अधिकारी यांच्या बंडातील हवा काढून घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मतदारसंघातून अधिकारी यांच्या विरोधातच निवडणूक लढविली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या धाडसाचे कौतुक झाले होते. कारण नंदीग्राम हा अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आव्हान देऊन हीच स्टाईल मारण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत असल्याची चर्चा होत आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. मात्र ममता बॅनर्जी या डॅशिंग आणि स्वकर्तुत्वावर मोठ्या झालेल्या नेत्या आहेत. आदित्य ठाकरे यांचे पूर्ण कारकिर्द आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात गेली. त्यामुळे त्यांचे ठाण्यातून लढणे हा फुकाचाच दम असल्याचेही बोलले जात आहे.