रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी भावना गवळी यांनी घेतली अमित शहांची भेट

महिलांना पुढे करून राजकारण करणारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

भावना गवळी यांनी माध्यमांशी संवाद साधताना रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला. रोशनी शिंदे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप गवळी यांनी यावेळी केला आहे.प्रत्येक ठिकाणी सरकारला बदनाम करायचे, एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचे. कोणी तरी सकाळी उठायचे. निवेदन करायचे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करायचे. अशा प्रकारची कारवाई विरोधी पक्षांकडून सुरू आहे. असे लोक जे खोटे बोलतात. त्यांची आधी चौकशी केली पाहिजे. त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा, ही मागणी मी माझ्या निवेदनामध्ये केली आहे.

ठाकरे गटाच्या खासदारांनी गृहमंत्र्यांना जे निवदेन दिलं आहे. ते अत्यंत चुकीचं निवेदन त्यांनी केलं आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होता.खर तर त्यांनी ठाण्यात प्रवेश करायचा होता. पण त्यांना जाण्यासाठी कोणताचं मार्ग नव्हता. म्हणून रोशनी शिंदेंचे प्रकरण ठाकरे गट चालवत आहे. मात्र, पोलिसांचा जो अहवाल आला आहे त्यात स्पष्ट झालं आहे की त्या ठिकाणी काहीही झालेलं नाही.असे भावना गवळी म्हणाल्या