ठाण्यात काल ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या पदाधिकारी महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिलाच मोर्चा होता. त्यामुळे सर्वच शिवसैनिक या मोर्चाला एकवटले होते. यावेळी पोटतिकडीने घोषणा दिल्या जात होत्या. सरकारचा निषेधही नोंदवला जात होता. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे या सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवत होत्या. मात्र, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
युवासेना परिवारातील हरहुन्नरी कर्तृत्वान रणरागिणी म्हणून दुर्गा भोसले-शिंदे यांची ओळख होती. त्या काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चा सुरु असताना सहकारी शिवसैनिकांसोबत त्या उत्स्फूर्त घोषणा देत चालत होत्या. मात्र यावेळी चालतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.
त्यांना तातडीने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनामुळे शिवसेना ठाकरे गट, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जबर धक्का बसला आहे. आज त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी सहा वाजता बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
