आम्हीही सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली पण नंतर सोबत जेवलो; विनोद तावडे यांचा ठाकरेंना टोला

आम्हीही सत्ताधारी पक्षावर प्रचंड टीका केली होती. मात्र नंतर सोबत जेवण केलं होतं. माजी मुख्यमंत्री आरोप करतात हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा राजकारणाची वेगळी परंपरा आहे, असा टोला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. तावडे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाहीच्या राजकारणाला फुलस्टॉप दिला आहे. घराणेशाही कडून येणाऱ्या हुकूमशाहीला फुलस्टॉप दिला आहे. राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. मात्र गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्रातल्या सरकारवर कुठलेही आरोप नाही. त्यामुळे भ्रष्टाचार विरहित सत्ता देता येते हे भाजपने सिद्ध केले आहे. तरीही विरोधकांकडून सातत्याने भाजपला विरोध करणे सुरू असते. त्यांच्याकडून हे आपल्या घराणेशाच्या पक्षाच्या आधारे सुरू आहे.

43 व्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनातून पक्क ठाऊक आहे की, भाजपा हा सत्तेसाठी नाही. सत्ता ही समाज परिवर्तनाचे साधन आहे. हे साध्य नाहीये. समाज परिवर्तन करण्याचं काम गतीने होण्यासाठी भाजप तत्परतेने काम करते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मनाशी प्रतिज्ञा करतो आहे. भारतमातेला विश्व गौरवाच्या शिर्ष स्थानी पोहोचण्यासाठी अपार कष्ट करून आणि जन्मसामान्यांच्या विकासासाठी काम करेल.