भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत त्यांच्यांकडून खंडणी मागत होता. पुणे पोलिसांच्या रडारवर तो अनेक दिवसांपासून होता. धमकी देताना तो मुलीच्या नावाचाही वापर करत होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या तिघांनाही धमक्या देणारा व्यक्ती एकच आहे. हा धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात रहातो आणि विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल चालवतो. या व्यतिकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला.त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहे
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले होते. त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी देत लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली होती. पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘इलेक्शनला उभे राहू नका, अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी धमकी व्हाट्सअप कॉलकरून देण्यात आली होती.
