पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी; ‘ही’ नावं चर्चेत

पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे.गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल यासाठी नावांची चाचपणी सुरु झाली आहे.

भाजपकडून पुणे लोकसभा पटोनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट किंवा मुलगा गौरव बापट, पुण्याचे माजी महापैर मुरलीधर मोहळ, पुण्याचे माजी खासदार संजय काकडे, यांच्यासोबतच मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावं चर्चेत होती. मात्र गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर पुण्यात झळकले होते. त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांचं नाव देखील मागे पडलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.

दरम्यान दुसरीकडे ‘मविआ’कडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांना पुण्याच्या पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. मोहन जोशी यांचं नाव देखील चर्चेत आहेत.