बॉलीवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून फक्त बॉलिवूडप्रेमींमध्येच नाही तर संपूर्ण गृहखात्यात चर्चेत आहे. सलमान खानला एकामागून एक मिळणाऱ्या धमक्यांनी मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. तसं तर सलमान खानला यापूर्वीही धमक्या आल्या आहेत, मात्र यावेळी त्याची अधिक गांभीर्यानं दखल घेतली जात आहे. खबरदारी म्हणून सलमान खाननं नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. जेणेकरून घराबाहेर पडल्यानंतर काही घटना घडलीच तर या कारद्वारे सलमान खान स्वतःचा बचाव करू शकेल.
सलमानने आपल्या ताफ्यात आता निसान पेट्रोल एसयूवीचा समावेश केला आहे. अद्याप ही गाडी भारतात लॉन्च झालेली नाही. पण सुरक्षेच्या दृष्टाने दबंग खानने ही गाडी विदेशातून मागवली आहे. दक्षिण आशियात या गाडीची चांगलीच क्रेझ आहे. ही बुलेटप्रूफ गाडी असल्याने या कारची किंमत खूपच जास्त आहे. दक्षिण आशियाच्या बाजारपेठेत ही कार बरीच लोकप्रिय आहे. ही कार भारतात विकली जात नाही, त्यामुळे सलमान खानने ही कार आंतरराष्ट्रीय बाजारातून खाजगीरीत्या आयात केली आहे. एसयूव्हीमध्ये ही सर्वात सुरक्षित कार आहे.
१८ मार्च रोजी सलमान खानला धमकीचा ई-मेल आला होता. रोहित गर्ग नावाच्या एका तरुणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई-मेल पाठवून ही धमकी दिली. या ई-मेलमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडील मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये बिश्नोईने दावा केला होता की, “सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे.” सलमान खानला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच सलमान खानच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली होती.
