नवी दिल्ली : एका वृद्ध गृहस्थाला भर रस्त्यात मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली.
स्वतः ट्विट करून सिद्धू यांनी ही माहिती जगजाहीर केली. मोदी सरकारला उद्देशून त्यांनी ट्विट केले. तुम्ही मला तुरुंगात घालू शकाल. माझी बँक खाते सील करू शकाल. पण माझी आणि माझ्या नेत्याची काँग्रेस पक्ष आणि पंजाब प्रति असलेली कमिटमेंट थांबवू शकत नाही, असा इशारा त्यांनी मोदी सरकारला या ट्विट मधून दिला.
तुरुंगात जाण्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू पंजाब प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. आम आदमी पार्टीने काँग्रेसला धूळ चारली. त्यावेळी सिद्धू यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. तीच काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली, असा आरोप माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला होता. काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून सिद्धू यांच्या सल्ल्याने चरणजीत सिंग चन्नी या दलित नेत्याला यांना मुख्यमंत्री केले होते. पण काँग्रेसची ही चाल देखील पंजाब मध्ये पक्षाला वाचवू शकली नव्हती. चरणजीत सिंग चन्नी हे कायम नवज्योत सिंग सिद्धू यांच्या छायेखाली राहिले. काही वेळा त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यावर सिद्धूंनी हाणून पाडले होते.
आता तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन आपली पक्षावरची आणि गांधी परिवाराची निष्ठा दाखवून दिली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना भेट दिली असली तरी ते त्यांना काँग्रेसमध्ये नवीन जबाबदारी देतात का हा प्रश्न आहे.
