छत्रपती संभाजीनगर : हिंदुत्व गुंडाळून ठेवून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. उद्या एमआयएमच्या मांडीवर जाऊन बसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणते हिंदूत्व राहिले आहे. त्यांनी सगळं हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. उद्या एमआयएमच्या मांडीवर जाऊन बसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ते खुर्चीसाठी कोणासोबतही जातील. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व ज्वलंत होते. मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जोड्याने मारले. राहुल गांधी सावरकर यांचा सातत्याने अपमान करत आहेत. राहुल गांधी बद्दल एक शब्दही उद्धव ठाकरे बोलले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी माफी मागायचा प्रस्ताव मांडला असेल तर त्यांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
