या नेत्यांच्या मुलांनी वडीलांच्या डोळ्यात अंजन घालून घेतला भाजपचा झेंडा हाती

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. के अँटनी यांचा मुलगा अनिल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अनिल एकटेच नाहीत इतरही अनेक नेत्यांच्या मुलांनी वडिलांच्या डोळ्यात अंजन घालून भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.


बीबीसीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यानंतर काँग्रेसकडून त्याचे समर्थन करण्यात आले होते. मात्र अनिल अँटनी यांनी त्यावरून काँग्रेसला सुनावले होते. अनिल अँटनीच नव्हे अनेक नेत्यांच्या मुलांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा मानून वडिलांच्या भूमिकेला विरोध केला आहे. माझी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार मानले जातात. मात्र त्यांचे चिरंजीव जयंत सिन्हा हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.


शिवसेनेचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे चाणक्य म्हणविले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. एका घरात राहूनही सुभाष देसाई यांना मुलाला शिवसेनेची विचारधारा शिकवता आली नाही. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा कॉंग्रेस नेते हरि सिंह सोलंकी यांची पुतणी आहे. गुजरात विधानसभेत आमदार असलेल्या रिवाबा यांचे सासरे काँग्रेसमध्ये आहेत.