महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या मनातलाच मुख्यमंत्री – दीपक केसरकर

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटत नसेल, ते उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटत नसेल. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच म्हटले होते की, मुख्यमंत्रीपदासाठी मला शरद पवारांनी जबरदस्ती केली. एकत्र येण्यासाठी आमच्याकडून जितका होईल तितका प्रयत्न केला होता.

एकनाथ शिंदे उद्यापासून (८ एप्रिल) दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे या अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये अयोध्येतील महाराष्ट्र भवनाबद्दल सकारात्मक चर्चा होईल.मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अयोध्येत जे मराठी बांधव जातील, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तिथे मोठं महाराष्ट्र भवन बांधण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतील. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा होईल. असेही यावेळी दीपक केसरकर म्हणाले.

मोठ्या माणसात आपण फार बोलायचे नसेते. स्वत: नरेंद्र मोदींनी बोलावलेले असतानाही उद्धव ठाकरे आले नाहीत. मोदींना दिलेले वचन त्यांनी मोडलेय. यात मोदी साहेबांनी त्यांना माफ करायला हवं. शेवटी मोठ्या भावाने लहान भावाला माफ करायला हवे, असेही केसरकर म्हणाले. ज्याप्रकारे उद्धव यांनी मोदींचा अपमान केला, त्यानंतर हे जुळवून आणणे उद्धव ठाकरेंच्या हातात असल्याचेही केसरकर म्हणाले. आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही केले. हे काळाच्या ओघात झालेली गोष्ट आहे असे सांगत एकनाथ शिंदे हे चांगला कारभार करतील असेही केसरकर म्हणाले.