नितीन गडकरी धमकी प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात मोठी बातमी आहे. हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाच्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण दिसतं त्यापेक्षा अधिक गंभीर आहे, असं सूत्रांनी सांगितलं. जयेशला बेळगावहून ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिक तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम पुन्हा बेळगावला जाणार आहे.

जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. ही टीम आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतली. या प्रकरणात आता नवीन मोठे खुलासे समोर आले आहेत. हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.