पवारांचा कात्रजचा घाट; वातावरण तापल्यावर काँग्रेसच्या प्रचारातील हवाच घेतली काढून

गलित गात्र झालेल्या काँग्रेसला प्रचाराचा एकमेव मुद्दा मिळालेल्या अदानी प्रकरणावर भाष्य करून शरद पवारांनी प्रचारातील हवाच काढून घेतली आहे. काँग्रेसने या मुद्द्यावर गेल्या अडीच महिन्यांपासून वातावरण तापवले होते. मात्र पवारांच्या मुलाखतीमुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे.

24 जानेवारी रोजी हिंडेंनबर्गचा अहवाल जाहीर झाला. त्यानंतर काही दिवसातच अदानी उद्योग समूहाच्या शेअरमध्ये घसरगुंडी सुरू झाली. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने पकडला. सुरुवातीच्या काळात मोदी सरकार आणि अदाणी यांच्या संबंधांवर काँग्रेस बोलत होती. मात्र त्यानंतर काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करायला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी संसदेत सुमारे तासभर भाषण केले. छायाचित्रेही दाखवली. त्यानंतर दानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोठून आले असा सवाल करत थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले.काँग्रेसने देशभर यासंदर्भात आंदोलनही केले. आगामी लोकसभा निवडणुकीत हाच प्रमुख मुद्दा याची काँग्रेसची तयारी सुरू आहे.

अडीच महिन्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राहुल गांधींची अनेक वेळा भेट झाली. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्यावरून निर्माण झालेल्या वादावर शरद पवार यांनीच त्यांना सुनावल्याच्या बातम्याही प्रसारित करण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या काळात शरद पवारांनी अदानीचा मुद्दा काढला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट सातत्याने अदानीचा मुद्दा काढत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावर पूर्ण चुप्पी साधंली होती.

संसदेमध्ये संपूर्ण अधिवेशन काळात अदानी प्रकरण गाजले. विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) मागणी करण्यासाठी संसदेला भेटीस धरले. या काळातील विरोधकांच्या आघाडीचे ज्येष्ठ नेते या नात्याने पवारांनी भूमिका मांडणे अपेक्षित असतानाही गप्प राहणे पसंत केले. जेपीसीच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे वातावरण तयार झाले आहे.काँग्रेसने एका अर्थाने वातावरण तयार केलेले असताना शरद पवार यांनी त्याला टाचणी लावली आहे.
शरद पवार यांनी केवळ हिंडनबर्ग अहवालावरून अदानी उद्योग समूहाचे समर्थन केलेले नाही तर देशाच्या विकासात आदाने उद्योगसमूहाचे असलेले योगदानही सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे अदानी अंबानी सरकार अशी टीका करत आहेत. त्यावरूनही शरद पवारांनी खडसावले आहे. मुळात प्रश्न उपस्थित होतो गेल्या अडीच महिन्यापासून काँग्रेस हा मुद्दा लावून धरत असताना पवारांनी त्यांना त्याच वेळी का रोखले नाही. की हेतूपूर्वक गप्प राहून काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवण्याचाच त्यांचा मानस होता अशी चर्चा आता सुरू झाली आहे.