अदानी – अंबानी टीका काय लावलीय, त्यांना टार्गेट का करता? शरद पवारांनी राहुल गांधींना खडसावले

सरकारवर टीका करताना अदानी – अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी काही चुकीचे केले असेल, अधिकारांचा गैरवापर केला तर बोला. पण काहीही अर्थ नसताना हल्ला का करता असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला आहे.

पवार म्हणाले, आजकाल सरकारवर हल्लाबोल करायचा झाल्यास अंबानी,अदानी यांचे नाव घेतले जाते. प्रश्न असा आहे की, तुम्ही ज्यांना टार्गेट करत आहात, त्यांनी काही चुकीचे केले असेल, अधिकारांचा गैरवापर केला असेल तर मग लोकशाहीत तुम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा 100 टक्के अधिकार आहे. पण काहीही अर्थ नसताना हल्ला करण्याचा, हे मला समजत नाही. पवार म्हणाले, “आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानींनी योगदान दिले आहे. देशाला त्याची गरज नाही का? विजेच्या क्षेत्रात अदानी यांनी योगदान दिले आहे. देशाला विजेची गरज नाही का? ही अशी लोक आहेत जे जबाबदारी घेतात आणि काम करतात. देशाचे नाव मोठे करतात. त्यांनी चुकीचे केले असेल तर तुम्ही हल्ला करा. पण त्यांनी ही पायाभूत सुविधा निर्माण केली आहे. त्यांच्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही.”

याबाबत संदर्भ देताना पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून हे या देशात घडत आहे. मला आठवते की, मी राजकारणात आलो तेव्हा सरकारच्या विरोधात बोलायचे झाले तर टाटा-बिर्ला यांच्या विरोधात बोलायचो. लक्ष्य कोण होते? टाटा-बिर्ला. टाटांचे योगदान समजल्यावर आम्ही टाटा बिर्ला का म्हणत राहिलो, असा प्रश्न आता पडतो.आज टाटा-बिर्ला यांचे नाव आघाडीवर नाही,वेगळे टाटा-बिर्ला सरकारसमोर आले आहेत.काँग्रेसच्या तिरकस प्रचारावर पवार म्हणाले, वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. टीका होऊ शकते. सरकारच्या धोरणांबद्दल ठामपणे बोलण्याचा अधिकार आहे, पण चर्चा व्हायला हवी. चर्चा आणि संवाद लोकशाहीत खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही चर्चा आणि संवादाकडे दुर्लक्ष केले तर लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल, ती नष्ट होईल.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे सांगताना पवार म्हणाले. “जेव्हा हे घडते, तेव्हा आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असतो. हे आपण समजून घेतले पाहिजे. संसदेत संघर्ष होऊ न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ठीक आहे,अधिवेशन त्यादिवशी चालणार नाही. पण दुसऱ्या दिवशी सभागृह चालवायचे असेल, तर मग तुम्ही संध्याकाळी बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा.आजकाल संवादाची ही प्रक्रिया नाही.