अदानी यांच्या हिंडेनबर्ग प्रकरणावर राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले. असं वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. दरम्यान, आता पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
अदानीनी घोटाळा केल्याचे सांगत आंदोलन करणाऱ्या पक्षांनी शरद पवार यांच्या वक्तव्यातून बोध घ्यावा, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अदानी उद्योग समूहाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी उद्योगसमूहाची उघडपणे पाठराखण केली होती. कल्याण येथे एमसीएचआई- क्रेडाईच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्स्पो 2023 च्या उद्घाटनासाठी आले असता माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हे मत व्यक्त केले.
अदानी उद्योग समूहाबाबत हिंडेंनबर्ग संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानंतर या समूहात 20 हजार कोटी कुणाचे आहेत असा प्रश्न विचारत काँग्रेस पक्षाने ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली होती, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने देखील याबाबत वारंवार केंद्र सरकारला जाब विचारला होता.मात्र असं असताना शरद पवार यांनीच अदानी उद्योग समूहाची पाठराखण केल्याने जे लोक या मुद्यावर आंदोलन करत होते त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता याबाबत नक्की काय ते त्यांनीच उत्तर द्यावे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
