राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापण्याची काँग्रेस नेत्याची धमकी

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. कोणत्याही खासदारास दोन वर्षांची शिक्षा झाली तर कायद्यानुसार त्याचे सदस्यत्व लगेच संपते. त्यानुसार राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले. न्यायालयाचा आणि लोकसभेच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष देशात ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र, हे आंदोलन सुरु असतानाच काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना सजा सुनावणारे न्यायाधीशांनाच थेट धमकी दिली. त्यांच्या या वादग्रस्त भाषणाची स्थानिक पोलिसांनी नोंद घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास करून पुढील योग्य कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले.

तामिळनाडूतील दिंडीगुल इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. यादरम्यान जिल्हाप्रमुख मणिकंदन म्हणाले, 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यावेळी त्यांनी न्यायमूर्ती एच वर्मा यांना उद्देशून म्हटलं, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली.

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी कर्नाटक येथे एका रॅलीत बोलताना ‘मोदी’ आडनावा संदर्भात वादग्रस्त विधान केले. मोदी आडनावाचे सगळेच चोर का असा सवाल करत त्यांनी काही दाखलेही दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. त्यावर निकाल देताना न्यायमूर्ती एच. वर्मा यांनी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.