भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘एकीकडे काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्ष वज्रमूठ यात्रा घेत असताना त्याच ठिकाणी सावरकरांचा अपमान होत आहे. इकडे सावकर आमचे आहेत म्हणून एक पक्ष स्पष्टीकरण देत आहे. तर दुसरा एक पक्ष सावरकरांबद्दल टीका करत आहे. यात विसंगती दिसून येतेय, अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली.
यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांचे जेष्ठ नेते हे सातत्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या स्वातंत्र्य सैनिका बद्दल अवमानास्पद वक्तव्य करत आहेत, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे माजी मुख्यमंत्री हे त्यांच्या मांडीला मांडी लावून वज्रमुठ सभा घेत आहेत. त्यामुळं त्यांचं बेगडी हिंदुत्व हे सर्वसामान्यांना कळलं असून भाजप आणि शिवसेना हेच हिंदुत्वाचे कडवे रक्षक आहेत. या गौरव यात्रेतून सावरकर यांच्या त्याग आणि निष्ठेची अनुभूति सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी या प्रसंगी संगितले.
खासदार संजय राऊत हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कर्जत येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर समाचार घेतांना ते म्हणाले की, मानसिकतेवर परिणाम झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत उत्तर देणे हे माझं काम नाही. त्यांनी लवकरात लवकर त्यांचा उपचार केला तर निश्चित महाराष्ट्रातमध्ये अनेक गोष्टी बदलतील. ज्यांनी आपलं वृत्तपत्र एका पक्षाकडे गहाण ठेवलेले असेल. त्यांनी वृत्तपत्र पारदर्शकतेच्या बाबतीत बोलू नये हे माझं ठाम मत आहे, असे विखे-पाटील म्हणाले.
