नवी दिल्ली : अदानींवर टीका करू नये, असे मी म्हटलो नाही. हा आरोप माझ्यावर लादू नका. पण देशाच्या विकासात अदानी – अंबानींचेही मोठे योगदान आहे. त्याचा विचार करा अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसला पुन्हा फटकारले आहे.
राहुल गांधींनी गौतम अदानींचा मुद्दा लावून धरल्यानंतर शरद पवारांनी एनडीटीव्ही च्या मुलाखतीत अदानींचे समर्थन केले. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर पवार म्हणाले, एनडीटीव्हीच्या मुलाखतीत आपण अदानींवर टीका करू नये, असे म्हटले आहे. त्याला काँग्रेसचा विरोध आहे. अदानींवर टीका करू नये, असे मी म्हटलो नाही. हा आरोप माझ्यावर लादू नका. पण एक जमाना असा होता की सत्ताधारी पक्षावर टीका करताना त्यावेळी टाटा – बिर्लांची नावे घेतली जात असत. आता अदानी-अंबानींची नावे घेतली जातात. टाटा – बिर्लांचे या देशाच्या विकासात मोठे योगदान होते, तसेच अदानी – अंबानींचेही योगदान आहे. त्याचा विचार केला पाहिजे एवढेच मी म्हणालो. त्याखेरीज मूळात देशात आता अदानी मुद्द्यापेक्षाही गंभीर अशा तीन समस्या आहेत. बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या मुद्द्यांवर एकत्र येऊन विरोधकांना काहीतरी पर्यायी योजना जनतेसमोर ठेवता आली पाहिजे. ती ठेवण्याचा विरोधकांनी प्रयत्न करावा.
अदानी प्रकरणात संयुक्त संसदेची संसदीय समितीच्या चौकशीची मागणी सर्व विरोधकांनी केली होती हे खरे आहे. पण त्या समितीमध्ये 21 सदस्य असतात. त्यापैकी जर 15 सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतील तर त्यामधून त्याच्या चौकशीतून कितपत सत्य बाहेर येईल?, याविषयी शंका वाटते एवढेच मी म्हणालो, असा खुलासाही पवारांनी केला आहे.
