उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप

सोलापूर : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सत्ता गेल्याने ते वैफल्यग्रस्त झाले असून त्यामुळे खालच्या पातळीवर टीका करत आहे, अशीही टीका त्यांनी केली.

सांगोला येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. विखे पाटील म्हणाले की, उद्भव ठाकरेंनी सत्ता मिळावी यासाठी मागच्या दाराने जनतेचा विश्वास घात केला. औरंगजेबाच्या भूमिकेचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे त्यांच्याकडून समर्थन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागायला हवी, आणि अशी मुक्ताफळे उधळण बंद करावे.

विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमकपणे भूमिका मांडतात पण त्यांनी पातळी सोडू नये, असे सांगून विखे पाटील म्हणाले माझ्याकडून तरी राज्यगीताचा अनादर होणार नाही. मी बसेपर्यंतच ते सुरू झाले, ते सुरू करत असताना सूचना द्यायला हवी त्याबद्दल काही संकेत आहेत. तरीही अनवधानाने झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.