मुंबई : आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचे आहे, त्यांची विधाने प्रतिक्रीया देण्याइतपत प्रगल्भ नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार हे अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले आहेत. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अयोध्येला जाणाऱ्या आमदारांवर टीका केली होती.
त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचे आहे. ते जे काही बोलतात त्यावर प्रतिक्रिया देण्याइतके प्रगल्भ ते बोलत नाहीत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरून टीका केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, सध्या कलियुग सुरू आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. ठीक आहे, पण आम्ही नक्कीच पुन्हा राम राज्य या महाराष्ट्रात आणू. हाच विचार घेऊन आम्ही चालत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते कालच अयोध्येत दाखल झाले. त्यांच्यासोबत बंडखोर आमदार, भाजप नेते, कॅबिनेटमधील मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले दिले.
