मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी, अजित पवारांचीही जीभ घसरली

सातारा : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे संबोधन केल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही जीभ घसरली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाणे ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची त्यांनी बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. कोणी ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर हौसे, नवसे, गवसे ट्विट करत राहणार. त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही.

पवार म्हणाले, प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री हे अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात, द्वेष पसरवण्यात कोणी करू नये एवढीच अपेक्षा आमची आहे.

आपल्या बहुचर्चित धरण वक्तव्यावर पत्रकारांना उलटा सवाल करताना अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत न पाणी पिता आत्मक्लेश केला. हे कुठल्या जाहीर भाषणांमध्ये मी वक्तव्य केलं होतं का? मी केलेले वक्तव्य चूकच होते. घोंगडी बैठकीमध्ये तशा पद्धतीने वाक्य जायला नको होते. त्याबाबत मी आत्मक्लेश केलेला आहे. तेच तेच काढून बेरोजगारी आणि महागाई कमी होणार आहे का?