बाबरी प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा रोख उद्धव ठाकरेंकडे-एकनाथ शिंदे

भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. पाटलांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारले आहेत. यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांचा रोख आताच्या माजी मुख्यमंत्र्याकडे (उद्धव ठाकरे) आहे. बाबरी मस्जिद पाडलीत्यावेळेस आताचे माजी मुख्यमंत्री आणि आता बोलणारे संजय राऊत कोठे होते? बाळासाहेंबाबद्दल पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे. असे पाटील यांना म्हणायचे असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

ज्यावेळी अयोध्येमध्ये विवादित ढाचा पाडण्यात आला तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. त्यांचे हे उद्गार सर्वश्रृत आहेत. त्याच वेळी गर्वसे कहो हम हिंदू हा नाराही बाळासाहेबांनीच दिला. यासंबंधी नंतर लखनऊच्या कोर्टात केस सुरू होती, त्यामध्येही बाळासाहेब तेथील कोर्टात गेले होते. लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल अशी मंडळही होती. त्यावेळी तेथे पक्ष वगैरे काही नव्हता. सर्वजण रामभक्त म्हणून काम करीत होते. तेव्हा बाळासाहेबांनी घेतलेली जाहीर परखड भूमिका सर्वांना माहिती आहे. त्यानंतर मुंबईत जी दंगल उसळली, तेथे बाळासाहेब नसते तर काय झाले असते? त्यांनी मुंबईचे रक्षण केले. मुंबईला वाचविले. ज्या ज्यावेळी देशावर संकटे आली, त्यावेळी बाळासाहेबांनी परखड भूमिका घेतली आहे.

आता जे लोक बोलतत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान मूग गिळून गप्प बसून सहन केला जात आहे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्याबरोबरच हे फिरत आहे, असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. अयोध्येत राम मंदीर आणि जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण केले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.