मुंबई: मुख्यमंत्रीपद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले होते. अन्य सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेतल्याने दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने तेव्हा ही चर्चा झाली नाही, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे.
बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान हाच मुद्दा समोर आला होता. महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरला होता.
‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्रीपद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. राजीनामा देण्याचा देण्याचा निर्णय कोण घेत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण, अन्य सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेतल्याने दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने तेव्हा ही चर्चा झाली नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
अदानी समूहाच्या ‘जेपीसी’ चौकशीच्या मुद्यावर शरद पवारांनी माघार घेतली आहे. विरोधी पक्षातील सहकाऱ्याचं वेगळे मत आहे. आम्हाला विरोधी पक्षात ऐक्य ठेवायचे आहे. त्यामुळे सहकारी मित्र पक्षांना ‘जेपीसी’ चौकशी व्हावी वाटत असेल, तर त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही. पण, विरोधकांच्या ऐकीवर दुष्पपरिणाम होऊ नये, म्हणून आम्ही आग्रह धरणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.
