राहूल गांधी यांच्यावर आता पुण्यात गुन्हा, सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांची तक्रार

पुणे : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणखी अडचणीत सापडले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी त्यांच्यावर पुण्यात मानहानीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोदी समाजाबद्दल वक्तव्य केल्याने राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सध्या ते जामीनावर आहेत. आता पुण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या वक्तव्यावर ही तक्रार दाखल केली आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सत्यकी सावरकर म्हणाले, “राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एका भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेला हा संदर्भ खोटा असून काल्पनिक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून आम्ही अनेकदा सावरकर यांच्याविरोधातील तथाकथीत माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकले आहे. पण प्रत्यक्षात त्या क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सावरकरांविरोधातील या विधानांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती सत्यकी सावरकर यांनी दिली आहे.

सावरकरांनी आपल्या 5 ते 6 मित्रांच्या मदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटला होता असे वक्तव्य राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये केले होते.