दिशा सालियनच्या खटल्याच्या भीतीने कोणा-कोणाचे हात पाय पकडले? नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. तुरुंगाच्या भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडलेही होते, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याच्यावर पलटवार करताना दिशा सालियनच्या खटल्याच्या भीतीने कोणा-कोणाचे हात पाय पकडले? असा पलटवार भाजपचे आमदार नितेश राणे याणी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की जेलच्या भीतीने शिंदेसाहेब भाजपाबरोबर गेले, मग पेंग्विन आणि UT यांनी (उद्धव ठाकरे) दिशा सालियनच्या खटल्याच्या भीतीने कोणा-कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल, लवकरच. ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी हैं.

दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत या दोघांच्या मृत्यू प्रकरणावरून नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान या अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. या प्रकरणाला दाबण्यात आले. सचिन वाझेंनीच हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केले,. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांची हत्या झाली. दिशा सालियनवर अत्याचार करून खून केला. आरोपींना अटक का झाली नाही? त्यात कोण कोण होते? कोण मंत्री होते? त्यांना का वाचवले? असा सवालही त्यांनी केला होता.