ठाकरे सरकार आणि बीएमसीचा 900 कोटींचा घोटाळा – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमीच विरोधकांवर घोटाळ्यांचे आरोप करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे सरकार आणि बीएमसीवर 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सत्तेत आल्या आल्या दहिसर येथील एका बिल़्डरला 900 कोटींची जमीन बहाल करण्याचा निर्णय घेतला,असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने १० वर्षे या जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव फेटाळून लावला. या जमिनीची किंमत १५ कोटी रुपयेदेखील नाही. पण सत्तेवर येताच ठाकरे सरकारने ३५४ कोटी रुपये रोख रक्कम देऊन हा भूखंड खरेदी करण्यात आला. आता बिल्डर पुन्हा साडेपाचशे कोटी रुपये मागतोय, असा ९०० कोटी रुपयांचा घोटाळा ठाकरे सरकारने केल्याचा आरोप, किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

महापालिकेचे त्यावेळचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापालिकेच्या सुधार समितीला पत्राद्वारे जमिनीचा ताबा घेण्यास स्पष्ट विरोध केला. त्यानंतर महापालिकेच्या सुधार समितीने परदेशी यांच्याकडे या भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मांडला, पण परदेशी यांनी तो फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर निशल्प रिऍलिटीने मांडलेला हा प्रस्ताव अव्यवहार्य असून तो फेटाळणे का आवश्यक आहे, यावरही सविस्तर टिप्पण्णी दिली होती.या भूखंडाची किंमत ५४ कोटीच्या आसपास असल्याचे परदेशी यांनी सांगितलं होतं. तसेच सूचनापत्रकात, कोणत्याही अडचणीविना अशा कोणत्याही जागेचा ताबा मिळाला पाहिजे, असे मत नोंदविले होते.