अपघातस्थळाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; ब्लॅकस्पॉट आयडेंटीफाय करण्याची सूचना

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोर घाट येथे एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बसमध्ये एकूण 40 ते 45 लोक प्रवास करत होते. या अपघाताची दखल सरकारने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळाची पाहाणी केली आहे. यावेळी शिंदे म्हणाले की, खोपोलीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. झांजपथकातील मुलं बसमध्ये होती. जखमी मुलाशी मी बोललो. वाहन वेगाने होतं. त्यांनी चालकाला वाहन सावकाश चालवण्याची सूचना केली होती, मात्र त्याने ऐकली नाही, असं जखमी मुलाने सांगितलं.

या दुर्घटनेत १३ जणांना आपले प्राणही गमवावे लागले. सकाळी ही दुर्घटना घडल्याचे कळल्यावर तात्काळ मदतकार्य करणारे हायकर्स आणि आयआरबी रेस्क्यू टीममधील सदस्यांशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली. या दुःखद अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील. अनेक अपघात प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास झाले आहे. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत, ते आयडेंटीफाय करण्याची सूचना केल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी देखील या दुर्घटनेची दखल घेतली आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी त्यांनी नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी, एमएसआरडीसींना सूचना केल्या आहेत असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.