काहींना इतिहास अन् वर्तमानही माहित नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

काँग्रेस नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावकरांवरील वक्तव्ये अजूनही थांबलेली नाहीत. या वक्तव्यांच्या निषेधार्थ भाजपने राज्यात ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्रा काढली होती. त्यानंतर वातावरण शांत होईल असे वाटत असतानात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावकरांबाबत अतिशय खळबळजनक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाची आठवण करून देत शिवानी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यावर म्हणाले की, काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहिही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. कोणीही एखादा बुद्धीपूर्ण तर्क मांडला तर माझ्यासारख्या माणसाने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. जर बिना तर्काचं (तर्कहीन) किंवा बिना बुद्धीचं (निर्बुद्ध) बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार.

माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात वीर सावरकरांविषयीचे विचार आक्रमकपणे मांडले. आपल्या भाषणात वीर सावरकरांवर टीका करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? दरम्यान, अशा माणसांची हे लोक (भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट) यात्रा काढत असल्याचा चिमटाही शिवानीने काढला आहे.