इंडियन प्रीमियर लीगमध्ये 20 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेले सर्व चार सामने गमावले आहेत. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर शनिवारी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर आज दिल्लीची कसोटी पाहायला मिळणार आहे.
दिल्ली संघात तसे नावाजलेले फलंदाज आहेत, परंतु वॉर्नर आणि त्याचा उपकर्णधार अक्षर पटेल यांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज निराशा करत आहेत त्याच मिशेल मार्श लग्नासाठी मायदेशी परतल्यामुळे त्यांची फलंदाजी अधिकच कमकूवत झाली आहे. तो आता संघात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघाने २०० पेक्षा अधिकची धावसंख्या उभारली होती. तरीदेखील गोलंदाज या धावांचा बचाव करू शकले नाही. त्यामुळे हा सामना जर जिंकायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. असे असले तरी सलामीला खेळणारा विराट कोहली चांगल्याच फॉर्मात आहे. कर्णधार डुप्लेसीही चांगली साथ देत आहेत, मॅक्सवेलला मात्र सातत्य दाखवावे लागणार आहे. तर कार्तिकला फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणातही चुका टाळाव्या लागणार आहे. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल आजच्या सामन्यातही प्रभाव पाडतील अशी आशा बंगळूरचा संघ करत आहे.
