अजित पवार चुकीच्या पक्षात, त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यावं – विजय शिवतारे

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यावं असे आमंत्रण शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिलं आहे. अजित पवारांनी अस्वस्थेतूनच पहाटेची शपथ घेतली होती. हे संपूर्ण देशाला आणि राज्याला माहिती असल्याचे शिवतारे म्हणाले.

विजय शिवतारे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या भाजप समर्थनावर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर पुरंदरच काय तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल, असं मोठं विधान शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केलं. चांगले लोक एकत्र आल्यावर देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील, असं ते म्हणाले.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना प्रादेशिक आहे. ते इकडे आले, तर चांगल्या पद्धतीचे वातावरण होईल. पण, तो अजित पवार यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजकारणात कधी कधी वावड्याही उडवल्या जातात. मात्र, अजित पवार हे भाजपमध्ये येणार, हे कोणाला नाही आवडणार, असे म्हणत शिवतारे यांनी थेट अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावे, असे खुले आमंत्रण दिले. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आले, तर पुरंदरला तुमचा विजय सोपा होईल का? या प्रश्नावर शिवतारे म्हणाले, की पुरंदरच काय संपूर्ण महाराष्ट्रात सोपे होईल. माझा पुरंदरमधील पराभव हा अपघात झाला आहे. आम्ही तिथे प्रचंड विकासकामे केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.