अजित पवारांनी सोशल मीडिया हँडलवरून डिलीट केले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबतचे वॉलपेपर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. आपली भूमिका सांगत पक्षाला त्यांनी दिलेला हा इशारा समजला जात आहे.

अजितदादा 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील असा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. हा निकाल विपरित लागल्यास भाजपकडून बी प्लॅन तयार असून त्यामध्ये अजित पवार महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले जात आहे.