पिंपरी-चिंचवड येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये मदत जाहीर

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात सोमवारी होर्डिंग कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले. तसंच त्यांनी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 3 लाखांची मदत जाहीर केली.

सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बंगळुरू- मुंबई हायवे शेजारी असलेल्या स्वामी हॉटेलजवळ एक मोठे अनधिकृत होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. शोभा विजय टाक (वय ५०), वर्षा विलास केदारी (वय ५०), रामअवध प्रलाद आत्मज (वय २९), भारती नितीन मंचल (वय ३३) आणि अनिता उमेश रॉय (वय ४५) या पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.