ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटात सैफ अली खानची एन्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या आरआरआर या चित्रपटांला भारतातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांची देखील पसंती मिळाली. लवकरच त्याचा ‘एनटीआर 30’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या ‘एनटीआर 30’ या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. सैफ अली खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ‘एनटीआर 30’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

एनटीआर आर्ट्सच्या ट्विटर अकाउंटवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआरसोबत सैफ अली खान दिसत आहे. या चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका दिसणार असल्याची चर्चा आहे. सैफ आधी निगेटिव्ह रोल करायला तयार नव्हता अशा बातम्याही आल्या होत्या, पण आता त्याने याला होकार दिल्याचं दिसतंय. याआधी संजय दत्तनेही साऊथ सिनेमात पाऊल ठेवले होते आणि तो ‘केजीएफ 2’ मध्येही नकारात्मक भूमिकेत दिसला होता.

सैफ अली खान शेवटचा ऋतिक रोशनसोबत ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवली नाही. सैफ हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. आता ‘एनटीआर 30’ द्वारे तो साउथ सिनेमात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.