नवी मुंबईत लवकरच मेट्रो धावणार

मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने दिल्ली मेट्रो रेल्वे विभागाचे आयुक्त आर. के. शर्मा यांच्या उपस्थितीत सर्व चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे अकरा किलोमीटरच्या मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर मे मध्ये सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने बेलापूर रेल्वे स्थानक ते पेंधर या अकरा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू करण्यात आले आहे; मात्र विविध अडथळे आल्याने डिसेंबर २०१५ पर्यंत सुरू होणारा हा मार्ग तब्बल दहा वर्षे रखडला होता. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला असल्याने महामेट्रोच्या देखरेखीत कामांना वेग आला आहे.

१७ ते १९ एप्रिलदरम्यान दिल्ली मेट्रो रेल्वे विभागाचे आयुक्त आर. के. शर्मा यांच्या उपस्थितीत बेलापूर ते पेंधर मार्गांवरील चाचणी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार शर्मा यांनी बेलापूर ते पेंधर मार्गावर मेट्रोचा प्रवास केला आहे. तसेच ही चाचणी विनाअडथळा झाली असल्याने लवकरच मेट्रो पूर्ण क्षमतेने रुळावर धावेल अशी शक्यता आहे.