आमदार राजन साळवी यांचे कुटुंबीय अलिबाग एसीबी कार्यालयात दाखल, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चौकशी

रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे गटाचे राजापुरचे आमदार राजन साळवी यांच्यासह कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे. त्यांचे सर्व कुटुंब अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बोलावण्यात आले आहे. राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी व मोठा भाऊ दीपक साळवी, मुलगा अथर्व साळवी, शुभम साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी आज होणार आहे.


आमदार साळवी यांना लाचलुचपत विभागाने मालमत्तेच्या चौकशीची नोटीस पाठवली होती. यानंतर त्यांनी डिसेंबर महिन्यात अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात हजेरी लावली होती. चार तास चौकशीनंतर आणखी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले होते. २० जानेवारी रोजी ते पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले होते. सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. साळवी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच, त्यांच्या आणि त्याच्या कुटुबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची यावेळी चौकशी करण्यात आली.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आले होते. राजन साळवी यांचा बंगला आणि रत्नागिरीतील हॉटेल यांचे मुल्यांकन करण्यात आले असून घर आणि हॉटेले क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग यांचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. या अंतर्गत अधिक माहितीसाठी आता साळवी कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.