बंडासाठी अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. ज्या नेते, आमदारांवर लक्ष आहे, ते फार बोलत नाहीयेत, मात्र काही नेते गेल्या काही दिवसांपासून सूचक संकेत देत आहेत. त्यातच आता द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि या बातमीत करण्यात आलेले दावे, वर्तवण्यात आलेल्या शक्यता यांची पडताळणी सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यामुळे अजित पवार पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे. यातच अजित पवार यांचं या विषयावर असलेले मौन देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे.

शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील आमदारांवर भाजपचा डोळा आहे. दोन्ही पक्षातून मोठ्या संख्येने आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. हे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदारांचा मोठा गट फुटणार असल्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसला देखील मोठा धक्का देण्याची तयारी भाजपने केल्याचे समजतंय.